सोलापूर :शेगाव निवासी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन गुरुवारी सकाळी सोलापूर शहरात झाले आहे. सोलापूरकरांनी अतिशय आनंदी व भक्तीमय वातावरणात या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी सोलापूर शहरात दाखल होताच, सोलापूर शहर पोलीस प्रशासनाकडून परंपरागत पालखीचे स्वागत करण्यात आले. गजानन महाराज पालखीचे हे ५४ वे वर्ष आहे. सोलापूर शहरामध्ये गजानन महाराज पालखीचे आज आणि उद्या असे दोन दिवस मुक्काम असणार आहे. त्यामुळे सोलापूरमधील वारकरी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आमदार प्रणिती शिंदें व मनपा आयुक्त यांची फुगडी: सोलापूर तुळजापूर महामार्गावरून गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन झाले. सोलापूर जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी पालखीच्या स्वागताला उपस्थित होते. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पालखी सोहळ्यात फुगडी खेळत आनंद लुटला. कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव आमदार प्रणिती शिंदे यांनी मनपा आयुक्तांसोबत फुगडी खेळली. राज्यात स्थिर सरकार यावे अशी विठुराया चरणी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली.