सोलापूर - महानगरपालिकेच्या महापौराची आज निवडणूक आहे. पालिकेच्या यशवंतराव सभागृहात ही निवड होणार असून, पालिका प्रशासनाकडून याची तयारी करण्यात येणार आहे. राज्यात अस्तित्वात आलेल्या नव्या महाराष्ट्र विकास आघाडीमुळे ही निवडणूक महत्वाची आहे. सध्ये येथे भाजपचा महापौर आहे. भाजप जागा कायम राखतो की महाआघाडीचा महापौर जिंकतो हे आज ठरेल.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता ३८ व्या महापौरपदाची निवड प्रक्रिया पालिका प्रशासनाकडून पूर्ण केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रवीण वायचळ हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. यावेळी पालिकेच्या सभागृहात उपस्थित असलेल्या नगरसेवकांचे हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. भाजपाकडून श्रीकांचन यन्नम आणि महाविकास आघाडीकडून सारिका पिसे यांच्यात थेट लढत होत आहे.
हेही वाचा -अपंगत्वावरही 'विजय', पीएच. डी. प्रवेश परीक्षेत पात्र; अपंग असल्याने गाईडने नाकारले
तब्बल ३० वर्षे काँग्रेसचा महापौर
सोलापूर महानगरपालिकेत ३७ मान्यवरांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला. महापालिकेच्या राजकारणात मागील तीस वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याने ३४ महापौर काँग्रेसचेच झाले. किशोर देशपांडे हे पुलोद आघाडीकडून निवडून आलेले पहिले काँग्रेसेतर महापौर होते. हा एक अपवाद वगळता महापालिकेत काँग्रेस पक्षाचेच महापौर झाले. २०१७ च्या पालिका निवडणुकीनंतर पालिकेच्या राजकारणात भाजपाने आपल्या बहुमताच्या जोरावर २१ वर्षानंतर शोभा बनशेट्टी यांना गैरकाँग्रेसी महापौर होण्याचा संधी मिळवून दिला.
हेही वाचा -नाणार प्रकल्प विदर्भात आणावा आशिष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हे आहेत आतापर्यंतचे महापौर
सोलापूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळताच प्रथम महापौर म्हणून पारसमल जोशी यांना महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतर अनुक्रमे तात्यासाहेब घोंगडे, इरय्या बोल्ली, विश्वनाथ बनशेट्टी, राजाराम बुर्गुल, बाबुराव चाकोते, भीमराव जाधव, युनूसभाई शेख, भालचंद्र अलकुंटे, विश्वनाथ भोगडे, सिद्राम आडम, भगवान चव्हाण, नारायण राठी, पूर्णचंद्र पुंजाल, किशोर देशपांडे , बंडप्पा मुनाळे, महादेव महिंद्रकर, धर्मांण्णा सादुल, मुरलीधर पात्रे, उमरखान बेरिया, विश्वनाथ चाकोते, मनोहर सपाटे, महेश कोठे, सुभाष पाटणकर, खाजादाऊद नालबंद, शेवंताबाई पवार, जनार्दन कारमपुरी, संजय हेमगड्डी, नलिनी चंदेले, विठ्ठल जाधव , अरुणा वाकसे, अरिफ शेख , अलका राठोड, सुशीला आबुटे, शोभा बनशेट्टी यांनी महापौर म्हणून काम पाहिले.