महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाळेबंदीत परप्रांतीय कामगारांनी घेतला गळफास, दोन महिन्यानंतर आढळला कुजलेला मृतदेह

टाळेबंदीच्या काळात एका परप्रांतीय हॉटेल कामगाराने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. ही बाब आज (रविवार) उघडकीस आली आहे. दुर्गंधी सुटल्याने आसपासच्या नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर ही घटना आज उघडकीस आली आहे.

By

Published : Aug 30, 2020, 7:09 PM IST

kuldipsing
मृत कुलदीपसिंग

सोलापूर - मोहोळ येथील एका हॉटेलमध्ये परप्रांंतीय कामगाराने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही आत्महत्या लॉकडाऊनच्या काळात केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कुलदीपसिंग सोलसिंग मारावी (रा. मध्यप्रदेश), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहरानजीक रुची नावाचे हॉटेल आहे. मुळ मालकाने हे हॉटेल चालविण्यासाठी दुसऱ्यास भाड्याने दिले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीपासून हे हॉटेल बंद होते. या हॉटेलमध्ये तीन परप्रांतिय मजूर राहण्यास होते. त्यापैकी दोघांना स्वगृही जाण्यासाठीचा पास मिळाला. मात्र्, कुलदीपसिंग याला पास मिळाला नाही. काही दिवस तो हॉटेलमधील प्राप्त अन्नधान्य खाऊन तो जगला. मात्र, तेही संपल्यानंतर त्याची परिस्थिती बिकट होत गेली. त्यानंतर त्याने साडीच्या सहाय्याने हॉटेलच्या स्वयंपाकगृहात गळफास घेत आत्महत्या केली. या काळात हॉटेल मालक व चालक दोघेही हॉटेलकडे फिरकले नाही.

हॉटेल बंद असल्याने टाळेबंदीच्या काळात ही घटना उघडकीस आली नाही. त्यामुळे ते फासावर लटकलेले मृतदेह कुजले व त्याची मोठी दुर्गंधी आजूबाजूला पसरली होती. जवळच असलेल्या कन्या प्रशालेजवळील नागरिकांनी मोहोळ पोलीस ठाण्याला याबाबत रविवारी (30 ऑगस्ट) सकाळी माहिती दिली.

यावरून पोलिसांनी हॉटेल परिसरात पाहणी केली. दुर्गंध कुठून येत आहे याचा शोध घेतला असता, रुची हॉटेलमधील ही घटना उघडकीस आली. मृतदेह कुजल्याने मृतदेहाचे शीर व धड फासावरून खाली पडले होते. तसेच मृतदेहाचे मांस इतरत्र पसरले होते. मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू, अशी नोंद झाली असून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व पोलीस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -नई जिंदगी परिसरातील 4 हजार 260 लिटर गावठी दारू जप्त, एकास अटक

ABOUT THE AUTHOR

...view details