सोलापूर- आषाढी एकादशीनंतर पंढरपूर शहरात स्वच्छता करण्यासाठी 300 स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले. चंद्रभागा तिरासह घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करण्यात आली. ही मोहीम अहमदनगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग, युवाचेतना फाउंडेशन यांच्यावतीने राबवण्यात आली.
आषाढी एकादशीसाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात. आषाढी वारीत वारकरी हजारो दिंड्यानी पंढरपूरमध्ये दाखल होतात. सर्वत्र भाविक विसावलेले असतात. आषाढी यात्रेनंतर येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य असते. यामुळे अनेक सामाजिक संस्था, संघटना स्वच्छतेचे उपक्रम राबवतात.
आर्ट ऑफ लिव्हींगचे जिल्हा प्रकल्प समन्वयक अमर कळमकर यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यामधून ३०० पेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानाचे हे पाचवे वर्ष असून गेल्या चार वर्षापासून पंढरपूर स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे. रविवारी सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. वेगवेगळे गट तयार करुन व प्रत्येक गटाचा एक प्रमुख नेमून वेगवेगळ्या परिसरात गटागटाने स्वच्छता करण्यात आली आहे.
पंढरपूर शहरातील ६५ एकराचा तळ, गोपाळपूर, वाळवंट परिसर, मंदिर परिसर, श्रीकृष्ण मंदिर, भक्ती मार्ग, प्रदक्षिणा मार्ग, नवी पेठ, रामबाग इतर ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा खच, ग्लास, केळीच्या साली, कुजलेले अन्न, तुटक्या चपला, पिशव्या, चंद्राभागा नदीतील कपडे असा कचरा गोळाकरुन मोठ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरण्यात आला. स्वच्छता अभियानात जयंत भोळे, घनश्याम झंवर, अॅड.सुनिल गडाख, विलास हारदे, ठकसेन गायके, योगेश काकडे, मिथुन धनराज, गणेश दळे, पांडुरंग राजगुरु, हर्षदा पोतदार सहभागी झाले होते.