सोलापूर:प्राथमिक माहितीनुसार तेजस इंडी हा पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो ट्रेनने पुण्याला जाणार होता; मात्र लिंगराज हाळके आणि गणेश शेरी यांनी दुचाकीवरून जाऊ असा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा ठरला व तिघा मित्रांना अपघातात जीव गमवावा लागला.
अरण गावच्या हद्दीत अपघात: महामार्ग पोलीस सूत्राकडील मिळालेल्या माहितीनुसार तेजस इंडी, लिंगराज हाळके आणि गणेश शेरी हे तिघे एकाच मोटार सायकल (एम. एच. १३/ डी. झेड. ९८२६) वरुन ट्रिपल सीट सोलापूरहून पुण्याला निघाले होते. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान ते सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ असलेल्या अरण गावच्या हद्दीत वरवडे नाका येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. या अपघातात तेजस इंडी आणि लिंगराज हाळके यांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा मित्र गणेश शेरी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र त्याचाही मृत्यू झाला.
'त्या' वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल:महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या महामार्ग पोलिसांनी अपघातातील दुचाकी वाहन बाजूला करून तिघांना तातडीने टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या अपघात प्रकरणी किरण सुभाष इंडी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जोग हे करीत आहेत.