सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावामध्ये शुक्रवारी दुपारी आईसह दोन मुलींचा मृतदेह शेततळ्यामध्ये आढळून आला होता. शेततळे असलेली शेती ही मृत महिलेच्या नणंदेची असल्याची माहिती समोर आली होती. त्याच शेजारी मृत महिलेच्या नवऱ्याचे शेत असून द्राक्षाची बाग आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, घातपात की आत्महत्या याची चर्चा सुरू झाली होती.
या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून मृत सारिका ढेकळे यांच्या आई लक्ष्मी व्यंकट सुरवसे (रा. नंदगाव, तालुका तुळजापूर) यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिघांना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
हेही वाचा - हृदयद्रावक.. शेततळ्यात बुडून आई व दोन चिमुकलींचा मृत्यू, उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना
या प्रकरणातील संशयित आरोपी -
महिलेसह दोन चिमुकलींच्या मृत्यूस कारणीभूत आणि हुंडाबळी या कलमाखाली गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये आकाश उर्फ अक्षय उत्तम ढेकळे (वय २२ वर्ष ), उत्तम मच्छिंद्र ढेकळे (वय ५४ वर्ष ), अनिता उत्तम ढेकळे, अण्णासाहेब उत्तम ढेकळे( वय २५ वर्षे ), पुजा अण्णासाहेब ढेकळे (मुळेगाव-बेलाटी ता. उत्तर सोलापूर सध्या पाथरी ता उत्तर सोलापूर), विलास सुरवसे, सोजरबाई विलास सुरवसे (रा. नंदगाव ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद), साळुबाई बाळा गुंड, बाळा गुंड, छकुली ( रा. पाथरी ता. उत्तर सोलापूर )यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी पतीसह सास व दिराला अटक -
पोलिसांनी याप्रकरणी पती अक्षय ढेकळे, सासरा उत्तम ढेकळे व दीर अण्णासाहेब ढेकळे यांना अटक केली आहे. तिघांना न्यायदंडाधिकारी मिसाळ यांच्यासमोर हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या बाजूने अॅड. प्रशांत नवगिरे व अॅड. श्रीपाद देशक तर सरकार पक्षातर्फे अॅड. बनसोडे काम पाहत आहेत.
मृत महिलेच्या आईची फिर्याद-
लक्ष्मी सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीतमध्ये म्हटले की, मृत सारिका हिचा विवाह 2017 खाली आकाश उर्फ अक्षय ढेकळे सोबत झाला होता. तेव्हापासून सारिका हिला सासरचे लोक त्रास देत होत. लग्नात मानपान म्हणून चांगला आहेर केला नाही. सोने दिले नाही म्हणून तिला घालून पाडून बोलणे, टोचून बोलणे, अपमान करणे, तिला नवीन कपडे न देणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, फोनवर बोलू न देणे, दोन मुली झाल्या म्हणून टोचून बोलणे, या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून सारिका हिने आपल्या दोन मुलींना घेऊन शेततळ्यात जीव दिला, अशी फिर्याद दिली आहे.