सोलापूर - विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोबाइल चोरी करणाऱ्या 4 संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 53 हजार रुपयांचे मोबाइल आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. या आरोपींमधील एका संशयित आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. बाकीच्या तीन आरोपींचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे जामीन झालेला संशयित आरोपी हा तेलंगणा राज्यातील आहे. तो बाजारात जाऊन गर्दीचा फायदा घेत मोबाइल लंपास करत होता. चोरलेले मोबाइल जमिनीत पुरून ठेवत होता.
मोबाइल चोरट्यास रंगेहाथ अटक
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हतुरे वस्ती येथे मोठे भाजी मार्केट आहे. या ठिकाणी नेहमी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत व्यंकटेश नारायण पिटला (35 वर्ष, रा. श्रीनिवास नगर, जि. करनुल, तेलंगाणा) हा हातचलाखी करत मोबाइल लंपास करत होता. वाढत्या चोऱ्यामुळे पोलिसांची एक टीम वेषांतर करून बाजारात नजर ठेवून होती. व्यंकटेश पिटला याच्या संशयित हालचालीवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आणि त्याला मोबाइल चोरी करताना रंगेहाथ पकडले. व्यंकटेश पिटला याला अधिक विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली. त्याने अक्कलकोट नाका येथे भाड्याने एक खोली घेतली असल्याची माहिती दिली. खोलीजवळ जमिनीत मोबाइल पुरून ठेवले असल्याचेही सांगितले. काही दिवसानंतर चोरीचे सर्व मोबाइल तेलंगणा राज्यात जाऊन विविध ठिकाणी विक्री करत असल्याचीही कबुली दिली. दरम्यान, त्याला अटक करून 5 स्मार्टफोन आणि एक मोटरसायकल, असा 1 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उशाला ठेवलेले मोबाइल करायचा लंपास