सोलापूर- काळविटाचे मटण विकत घेणे महागात पडले असून मटण खाणाऱ्यांना वन विभागाने अटक करून पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. काळवीट शिकार प्रकरणी वन खात्याने एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. विजयकुमार सुदाम भोसले, विष्णू बनसोडे व मुतप्पा कोळी, अशी वन खात्याने अटक केलेल्यांची नावे आहेत.
28 ऑगस्टला दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी येथे काळवीट हरणाची शिकार करून त्याची 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने मटण विक्री केले जात होते. नेचर कंजर्वेशनच्या सदस्यांना यापूर्वी देखील खबर लागली होती. त्यांनी एका खबऱ्याला संगदरी गावात गुप्त बातमीसाठी ठेवले होते. तसेच वनविभागाला देखील कल्पना दिली होती. 28 ऑगस्टला रात्री तालुका पोलीस ठाणे व वन विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विजयकुमार भोसले याला काळवीट हरणाचे मटण विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याच्या घरातून हरणाला पकडण्याचे जाळे, कुऱ्हाड, लोखंडी सुरा, मटण असा विविध मुद्देमाल जप्त केला होता. विजयकुमार भोसले यास न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.