सोलापूर -अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई एलसीबीच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक यासाठी कार्यरत करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सीना नदी पत्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा पॉईंटवर कारवाई केली आहे. या कारवाईत सतरा संशयीत आरोपींविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यातील सर्वात मोठी कारवाई -
एलसीबीच्या पथकाने मागील काही दिवसापूर्वी मौजे कुमठे (ता. अक्कलकोट) येथील वाळू उपस्यावर कारवाई केली होती. अवैध वाळू उपषावर कारवाई करत एकूण 3 लाख 37 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. या कारवाईत बोटी (जलयान) जाळण्यात आल्या होत्या.
यारी मशीनच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात होता-
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की, मौजे आष्टे (ता. मोहोळ जि. सोलापूर ) येथील सीना नदीच्या पात्रातून काही व्यक्ती यारी मशिनच्या सहाय्याने शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करत आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलीस प्रमुख यांनी विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह मौजे आष्टे (ता. मोहोळ जि. सोलापूर) येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली. या ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशिन जोडून सिना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले. त्यावरून वाळू उपसा पॉईंटची खात्री झाल्यानंतर पॉईंट पासून काही अंतरावर असलेल्या उसामध्ये मध्यरात्री पोहचून पिकात पथक दबा धरून बसले असता पहाटेच्या सुमारास काही वाहने वाळू भरण्यासाठी पॉईंटवर आली व वाळू भरून निघण्याच्या तयारीत असताना 12 इसमांना गराडा घालून पकडले. यावेळी 7 संशयीत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.