महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन?, म्हणण्याची डॉक्टरांवर वेळ - solapur oxygen news

सोलापुरात आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी दाखल होत आहेत. यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यात व्यापाऱ्यांनी चढ्या दराने ऑक्सिजन विक्री सुरू केल्याने खासगी रुग्णालयांत चिंतेचे वातावरण दिसत आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 27, 2020, 10:31 PM IST

Updated : Sep 28, 2020, 3:38 PM IST

सोलापूर -सोलापुरातील अनेक खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रशासनाला सुचितही केले. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असून खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना कोणी ऑक्सिजन देता का, असे म्हणायची वेळ आली आहे.

कोणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन?, म्हणण्याची डॉक्टरांवर वेळ


कोरोनाग्रस्त रुग्णाला श्वसनासाठी त्रास होतो. त्यामुळे त्याला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन कृत्रिमरित्या द्यावा लागतो. सोलापुरात सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे सध्या सोलापुरात काही अपवाद सोडल्यास सर्व कोविड व नॉन कोविड रुग्णालय ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.

सोलापुरात मुंबई, कर्नाटकातील बेल्लारी व हॉस्पेट या भागातून लिक्विड ऑक्सिजन येतो त्यानंतर येथील ऑक्सिजन प्लांटमध्ये त्याचे सिलेंडरमध्ये वर्गीकरण केले जाते आणि पुरवठा केला जातो. पण, कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने काही व्यापारी ऑक्सिजनची चढ्या दराने विक्री करत आहेत. यामुळे खासगी रुग्णालयधारक ऑक्सिजनचा तुटवडा मोठा निर्माण होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रंम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2013 ते 2018 पर्यंत 15 रुपये प्रति किलो दराने ऑक्सिजन मिळत होते. 2018 नंतर यामध्ये थोडीशी वाढ झाली आणि 16 ते 17 रुपये प्रति किलो ऑक्सिजन मिळत होते. पण, जसे ही कोरोनाकाळापासून सोलापूरला होणारा ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे प्रति किलो 27 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ झाली. प्रति दिवस 700 किलो लागणारा ऑक्सिजन आता मात्र प्रति दिवस 2 हजार किलो ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. अचानकपणे ऑक्सिजनचे दर वाढल्याने खासगी रुग्णालयातील आर्थिक गणित विस्कळीत होत चालले आहे. प्रशासन एकीकडे खासगी रुग्णालयांच्या बिलांवर नियंत्रण आणत आहे. पण, रुग्णालयाला पुरवठा होणाऱ्या वस्तूंवर नियंत्रण करत नाही, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

डॉ. सुदीप सारडा म्हणाले, सोलापूरच्या जवळच असलेल्या तामलवाडी येथील प्लांटमधून सुरळीत ऑक्सिजन पुरवठा होत होता. पण, तामलवाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याने हा पुरवठा सोलापूरसाठी बंद करण्यात आला आहे. सोलापुरातील ऑक्सिजन विक्रेते किंवा त्याचे वितरक हे परजिल्ह्यातून ऑक्सिजन मागवत असल्याने तेथील व्यापारी चढ्या दराने ऑक्सिजन विक्री करत आहेत. तसेच ऑक्सिजन घेऊन सोलापुरात आणणे हे जास्त खर्चिक ठरत आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरचे दर कडाडले आहेत. सोलापुरात एकूण 350 खासगी रुग्णालय आहेत. त्यामधील 25 रुग्णालय कोरोनासाठी आरक्षित केले आहेत. प्रशासनाकडून मिळणारा ऑक्सिजन कोविड रुग्णालयांसाठी आहे. मात्र, इतर आजारातही रुग्णांना ऑक्सिजन लागतो त्यामुळे इतरांना ऑक्सिजन कसे पुरवायचे, असा सवाल यावेळी डॉ. सारडा यांनी उपस्थित केला.


जेवढा ऑक्सिजनसाठा तेवढेच रुग्ण दाखल करून घेत आहेत

चढ्या दराने ऑक्सिजन मिळत असल्याने खासगी रुग्णालय हतबल झाले आहेत. म्हणून त्यांनी जेवढे ऑक्सिजन तेवढेच रुग्ण दाखल करून घेत आहेत. प्रशासनाने हॉस्पिटलच्या बिलांवर नियंत्रण आणले आहेत. पण, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांवर कोणतेही नियंत्रण नाही. अतीदक्षता विभागातील रुग्णाला कधी-कधी प्रति मिनिटाला 50 ते 60 लिटर इतक्या ऑक्सिजनची गरज पडते. अशावेळी अती दक्षता विभागातील रुग्णाला प्रति मिनिट 12 लिटर व साधारण वॉर्ड मधील रुग्णाला प्रति मिनिट 6 लिटर ऑक्सिजन देण्याचे फर्मान सरकारने दिले आहे. पण, ही हास्यास्पद बाब असल्याची माहिती खासगी डॉक्टर म्हणत आहेत.


वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे; नाहीतर उपचार बंद होईल

ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे, त्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात आणि नियमित करणे, ऑक्सिजनच्या दरावर नियंत्रण आणणे या सर्व गोष्टी सरकारी अधिकाऱ्यांकडून जर वेळीच झाल्या नाही, तर कदाचित रुग्णालयांना कोविड व नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणे बंद करावे लागेल, अशी खंत खासगी डॉक्टर व्यक्त करत आहेत. या बाबीचे गांभीर्य सरकारने वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

हेही वाचा -केतन उपासे आत्महत्या प्रकरण: तेरा खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल; तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

Last Updated : Sep 28, 2020, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details