पंढरपूर -माढा येथे न्यायालय परिसरात असणाऱ्या एका घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी घरातील जिन्याच्या दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह सात लाख 61 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमृता जगताप यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता जगताप, त्यांच्या आई व मुलगा प्रथमेश असे तिघेजण हॉलमध्ये झोपले होते. तर वडील अमरदीप हे बेडरूममध्ये झोपले होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास चार चोरट्यांनी जिन्याचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला, व चाकूच्या धाकावर घरातील फक्त सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.
7 लाख 61 हजारांचा मुद्देमाल लंपास
चोरट्यांनी कपाटातील 4 तोळ्यांच्या 1 लाख 40 हजार किंमतीच्या हातातील पाटल्या, 5 तोळ्यांचे 1 लाख 75 हजार किंमतीचे सोन्याचे गंठण, 4 तोळ्यांच्या 1 लाख 40 हजार किंमतीच्या बांगड्या, 5 तोळ्यांचे 1 लाख 75 हजार किंमतीचे गळ्यातील लॉकेट, 2 तोळ्यांचे 70 हजार किंमतीचे मिनी गंठण, 12.5 ग्रॅमचे 42 हजार किंमतीचे कानातील फुले, 1 ग्रॅम वजनाचा कळस व 2 ग्रॅम वजनाचे गळ्यातील बदाम आणि सॅमसंग कंपनीचा 10 हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण 7 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. घटनेनंतर अमृता यांनी माढा पोलिसांशी संपर्क साधला, माहित मिळताच पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.