सोलापूर -कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशातील सिनेमागृहे, नाट्यगृहे यांना टाळे लावण्यात आले होते. शुक्रवारी (6 नोव्हेंबर) रात्री सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरातील सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू करण्यासाठी परवानगी दिली. यामुळे 50 टक्के प्रेक्षकसंख्येसह सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत.
सोलापूर शहरात एकूण दहा चित्रपटगृहे व तीन नाट्यगृहे आहेत. इतिहासात पहिल्यांदाच या चित्रपटगृहांना व नाट्यगृहांना कोरोना महामारीमुळे टाळे लावण्यात आले होते. अनलॉक सुरू झाल्यानंतर बाजारपेठ, शासकीय कार्यलये, खासगी कार्यालये, आदींना परवानगी देण्यात येत आहे. आता राज्य शासनाने सिनेमागृहे व नाट्यगृहांनाही परवानगी दिली होती. मात्र, सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी खबरदारी म्हणून शहरातील सिनेमागृहे व नाट्यगृहांना परवानगी दिली नव्हती. काल पालिका आयुक्तांनी परवानगी दिली. या निर्णयामुळे थिएटरमध्ये काम करणारे कर्मचारी व मालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाट्यक्षेत्रात काम करणारे कलाकार देखील या निर्णयामुळे खुश आहेत.
थिएटर मालकांनी सुरू केली तयारी -
आज शहरातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे स्वच्छ करण्यात आली. आशा थिएटर, चित्रमंदिर, प्रभात टॉकीज मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेतले आहे. शासनाने दिलेल्या नियमांत राहून व्यवसाय सुरू करण्यास थिएटर मालक सज्ज झाले आहेत. सिनेमागृहात सामाजिक अंतर राखण्यासाठी खुर्च्यांच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दोन खुर्च्यांमधील एक खुर्ची रिकामी ठेवावी लागणार आहे.