सोलापूर - संचारबंदीच्या काळात रात्रीच्या वेळी दवाखान्यात जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी वाहन न मिळाल्यामुळे महिलेची भर चौकात प्रसूती झाली. पंढरपूरातील सांगोला चौकात रस्त्यावर मध्यरात्री 2 वाजता महिला प्रसूत झाली आणि कन्येला जन्म दिला आहे. भर रस्त्यावर प्रसूती झाल्यानंतर बाळ व बाळांतीन दोघेही सूखरूप आहेत.
वेळेवर वाहन न मिळाल्याने महिलेची रस्त्यावरच प्रसुती संतपेठेत राहणाऱ्या गायकवाड कुटूंबातील गौरी गायकवाड ही नऊ महिन्याची गर्भवती. 29 एप्रिलच्या मध्यरात्री 2 वाजता गौरीला प्रसवकळा सुरू झाल्या. कळा सुरू झाल्यानंतर गौरीने तिच्या पतीला याबद्दल सांगितले. दोघेही दवाखान्यात जाण्यासाठी बाहेर पडले. पण सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात दिवसा वाहन मिळणे अवघड तेव्हा मध्यरात्री 2 वाजता वाहन मिळणे दुरापस्त. गौरी व तिचा पती हे दोघेही चालत सांगोला चौकात आले आणि वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू लागले. मध्यरात्रीची 2 ची वेळ असल्यामुळे लवकर वाहनाची सोय होत नव्हती.
वाहन मिळत नसल्यामुळे खंडू गायकवाड याने स्थानिक नगरसेवकांकडे जाऊन मदत मागण्याचा विचार केला आणि तो स्थानिक नगरसेवाककडे वाहन मिळविण्यासाठी गेला. खंडू वाहन घेऊन परत येईपर्यंत गौरी रस्त्याच्या बाजूला प्रसूत झाली आणि कन्येला जन्म दिला. त्यानंतर नगरसेवक कृष्णा वाघमारे यांच्या मदतीने गौरी व तिच्या नवजात बालकांना दवाखान्यात नेण्यात आले.
खंडू वाहन आणण्यासाठी गेल्यावर गौरीची प्रसूती झाली. प्रसूती झाल्यानंतर आपला मालक परत येई पर्यंत राजा नावाचा श्वान हा गौरीच्या बाजूला दोघांची रखवाली करत होता. गौरी ही पतीची वाट पाहत रस्त्यावरच वेदनेने तडफडत पडली होती. रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. खंडू परत आल्यानंतर त्याने नगरसेवक कृष्णा वाघमारेंच्या मदतीने गौरीला दवाखान्यात नेले. गौरीला तपासून घरी आणले असून बाळ-बाळांतीन सुखरूप आणि सुरक्षित आहे. कन्यारत्न प्राप्त झाल्याने या वीट भट्टी कामगाराच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा -सोलापूर शहराची हद्दवाढ केलेल्या भागात कोरोनाचा रुग्ण; प्रशासनाकडून परिसर सील