सोलापूर - मोहोळ तालुक्यातील नरखेड गावाजवळ कडबा चारा घेऊन जाणाऱ्या वाहनाने अचानक पेट घेतला. यामध्ये दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. विजयकुमार मोटे व बाळासाहेब निंबाळकर असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी शेतकऱ्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पीकअप वाहनाने अचानक घेतला पेट
मोहोळ तालुक्यातील नरखेड ते अनगर या मार्गावरून विजयकुमार मोटे आणि बाळासाहेब निंबाळकर हे पीकअप वाहनातून कडबा घेऊन जात होते. पण अचानक कडब्यात आग लागली. दोघे शेतकरी वाहनाच्या समोरील बाजूला बसले होते. कडबा मागील बाजूस होता. कडब्याने पेट घेतला याची माहिती शेतकऱ्यांना झाली नव्हती. ज्यावेळी मोठी आग लागली त्यावेळी त्यांच्या लक्षात आले. मात्र, तोपर्यंत आगीने चोहोबाजूंनी पेट घेतला होता. या आगीत दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले आहे.