सोलापूर (पंढरपूर) - पंढरीचा सावळा विठ्ठल हा गोरगरीब शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. परंतु विठ्ठलाचे सावळे गोजीरे रूप भाविकांना नेहमीच आकर्षण ठरते. विठुरायाच्या भरजरी पोशाखाचेही भाविकांना कायम कुतूहल वाटते. त्या वस्त्रांमध्ये विठुरायाचे रूप प्रसन्न मुद्रेने पहावेसे वाटते. हे सर्व भरजरी वस्त्र विठुरायाला भाविकांकडून दान स्वरूपात येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून असेच वस्त्र विठुरायाच्या वापराविना मंदिर समितीकडे शिल्लक आहेत. त्यामुळे आता हे वस्त्र व पोशाख राज्यातील ग्रामीण भागातील विठ्ठल मूर्तींना परीधान करण्यासाठी मोफत भेट देण्याचा निर्णय विठ्ठल मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विठ्ठलही पांडुरंगाच्या रूपाप्रमाणे प्रसन्न मुद्रेत पहावयास मिळेल. हा उपक्रम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून आषाढी यात्रेपासून सुरू करणार आहे.
'श्री विठ्ठलाच्या भरजरी पोशाखाची हजारो रुपये किंमत'
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला दररोज परिधान केलेले वस्त्र भाविक देणगी स्वरूपात देत असतात. यामध्ये दैनंदिन वापराबरोबर सणासुदीच्या दिवशी श्री विठ्ठलाला पोशाख परिधान केले जातात. भरजरी पोशाखांची व वस्त्रांची किंमत दीड हजार रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत असते. यामध्ये विठ्ठलाच्या अंगी, धोतर, कद, उपरणे, फेटा असा आकर्षक भरजरीचा पोशाख परीधान केला जातो. त्यावर विविध सोन्याचे अलंकारही चढवले जातात. विठ्ठलाच्या कपाळी भाळी चंदनाचा टिळा लावला जातो. त्यामुळे पांडुरंगाचे रुपडे अजूनच खुलून दिसते. हे पोषाख परीधान केल्यावर गावा-गावातील विठ्ठल नटणार आहे. पांडुरंगाच्या भरजरी पोशाखाने पंढरपूरच्या विठ्ठल व रुक्मिणी मातेची रोज सायंकाळी चार वाजता नवीन पोशाख परीधान करून नित्य उपचार केले जात असतात. त्यामुळे प्रत्येक दिवशी भाविकांकडून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेला नवीन पोशाख दान स्वरूपात येत असतो.