सोलापूर - लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद पडली. अनेक लोकांचे रोजगार गेले. पतीची देखील नोकरी गेली. अशा कठीण प्रसंगी करायचे काय, असा प्रश्न पडला होता. पण या कठीण प्रसंगात हतबल न होता सोलापूरच्या शिवाई शेळके या महिलेने काळा तिखट आणि लाल तिखट या उद्योगातून आपल्या संसाराचा आर्थिक कणा मजबूत केला. एमबीए झालेल्या शिवाई शेळकेने पारंपरिक पद्धतीच काळा तिखटाचा उद्योग सुरू केला. त्यामुळे शिवाई यांचा उद्योग हळूहळू आता महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यात देखील नावारूपास येत आहे.
उद्योगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याऱ्या महिलेची कहानी उद्योगात आणली पुन्हा पारंपरिक पद्धत -
आज बाजारत अनेक प्रकारचे काळा तिखट, लाल तिखट उपलब्ध आहेत. मोठ्या कंपन्या आपलं स्थान टिकवण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करून ग्राहकांना आकर्षित करत आहेत. पण स्पर्धेच्या बाजारात दर्जेदार आणि पारंपरिक पद्धतीचा काळा तिखट आणि लाल तिखट शिवाई शेळके ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक कंपन्या फॅक्टरीमध्ये उत्पादन करत आहेत. पण शिवाईने या सर्व बाबींना फाटा देत जुनी पद्धत अवलंबली आहे. मिरची कांडप मशीनमध्ये मिरची कुटून आणि उच्च प्रतीचा मसाला वापरून दर्जेदार काळा तिखट उत्पादन करत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ मिश्रित केले नसून 100 टक्के नैसर्गिक असल्याची माहिती शिवाई यांनी बोलताना दिली.
महाराष्ट्र राज्यासह दोन राज्यात काळ्या तिखटला मागणी -
लॉकडाऊनमध्ये सुरू झालेल्या शिवाई फूड प्रोडक्टसच्या दोन ब्रँडसना भरपूर मागणी होत आहे. पुणे, मुंबई, लातूर, उस्मानाबाद, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यातुन देखील मागणी वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये सुरू केलेल्या या उद्योगाला काही महिन्यांतच प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये शिवाई यांचे पती अक्षय यांची नोकरी गेली. पण या संकटाशी शिवाई यांनी सामना केला. मे 2020 मध्ये सोलापुरातील राहत्या घरातून काळा तिखट आणि लाल तिखट हा उद्योग सुरू केला. बघता-बघता यांच्या मिरचीला इतर जिल्ह्यातुन मागणी वाढली आणि फक्त 10 महिन्यात जवळपास महिन्याला एक लाखांचे उत्पन्न यातून मिळू लागले आहे. पतीने देखील नोकरीची आशा सोडून पत्नीला या उद्योगात मदत करण्याचे ठरवले आहे.
नोकरीसाठी स्थलांतरित न होता उद्योग उभारला -
शिवाई शेळके यांनी सोलापुरातील एका महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2019 साली अक्षय शिंदे यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. पती मुंबई येथे नोकरीसाठी गेले होते. पण शिवाई यांनी सोलापुरातच राहणे पसंद केले. एक वर्षातच कोरोना महामारीने शिरकाव केला आणि लॉकडाऊन सुरू झाले. या संकटात एमबीएसारखे उच्च शिक्षण घेऊन देखील कोणत्याही स्वरूपाची लाज न बाळगता मिरची उद्योग सुरू केला. तसेच घरोघरी जात याची विक्री सुरू केली. ग्राहकांनी शंभर टक्के प्युअर असलेल्या या ब्रँड्सला भरपूर प्रतिसाद दिला. मार्केटिंगवर देखील कोणतेही खर्च न करता दर्जेदार तिखट विक्रीस सुरुवात केली.
महिलांनी आत्मनिर्भर व्हावं -
आज जगात आणि भारतात महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. अनेक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व दिसत आहे. उद्योगात देखील अनेक महिला आघाडी घेत आहेत. नोकरीसाठी अनेक महिला स्थलांतरित होत असतात. महिलांनी आत्मनिर्भर व्हावं आणि स्वतः च्या पायावर उभे रहावे, असा सल्ला यावेळी शिवाई शेळके-शिंदे यांनी महिला दिनानिमित्ताने दिला.