पंढरपूर (सोलापूर) -मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी-शिरर्शी हॉटसन डेयरी जवळ वाळू तस्करांनी पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर यांना चिरडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी वाळूचा टेम्पो जप्त केला आहे. मात्र आरोपी हा फरार झाला आहे. या प्रकरणामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
भरधाव टेम्पोने कॉन्स्टेबलला चिरडले -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनवलकर हे सकाळी 9.30 च्या सुमारास गोनेवाडी-शिरशी रोडवरील हॅट्सन डेयरी येथे लोकअदालतचा समन्स बजावण्यासाठी गेले होते. गोनेवाडीचे पोलीस पाटील यांना हॅट्सन डेयरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे वाट पाहत तिथे थांबले होते. यावेळी समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला हात केला होता. वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालक वाळूतस्कराचा शोध पोलीस घेत आहेत. सोलापूर जिल्हा पोलिसांकडून वाळू तस्करी करणाऱ्या टेम्पो चालक विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -धक्कादायक! पत्नीसह दोन वर्षाच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करुन पतीची आत्महत्या