सोलापूर- दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली असताना बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पहावयास मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. रेडिमेड कापड, फराळाचे साहित्य आदी वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये गर्दी पहावयास मिळत आहे. पण, या दिवाळीवर महागाईचे सावट निर्माण झाले आहे. फ्रीज, टीव्ही, मोबाईल आदी वस्तूंच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती यावेळी इलेक्ट्रॉनिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष केतन शहा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हप्त्यावर किंवा कर्ज करून वस्तू खरेदी करण्यावर अधिक भर
इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये टीव्ही, फ्रीज, स्मार्ट फोन, मायक्रोवेव्ह ओव्हन, आटा चक्की आदी वस्तू खरेदी करण्यास ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे. पण, ऐन दिवाळीत या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने रोख रक्कम ग्राहकांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे दुकानदारांनी फायनान्स, कर्जावरवर या इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. पण, व्याजासह त्या वस्तू आणखीन महाग मिळतात.
कोरोनानंतर महागाईचा फटका