सोलापूर - मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे राज्यातील मराठा बांधव संतप्त झाले आहेत. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी सोलापुरात आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी धरपकड केली. सोलापुरात आंदोलनापूर्वी मराठा समाजाच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात आज (5 मे) सोलापुरात आंदोलन करण्यासाठी आलेल्या सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार आणि भाऊसाहेब रोडगे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापूर येथील छत्रपती शिवाजी चौकात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षण रद्द
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्वरराव, न्या. एस. अब्दुल नाझीर, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्याच्या एसईबीसी वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी अंतिम सुनावणी करताना हा निर्णय दिला.