सोलापूर-शहर मैलामुक्त करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडे फक्त तीनच टँकर उपलब्ध आहेत. यामुळे सोलापूरकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. सांडपाण्याचा वेळेवर निचरा होत नसल्याने शहरातील नागरिकांना निरोगी राहणे अवघड झाले आहे. शहरातील विविध भागात सांडपाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था जोडली गेली नसल्यामुळे, आजसुद्धा शहरात उघड्या गटारी पाहायला मिळतात. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
28 वर्षांपासून हद्दवाढ भागात ड्रेनेज व्यवस्थाच नाही
1992 साली शहरालगत असलेल्या 11 ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून, त्यांचा समावेश सोलापूर महानगरपालिकेत करण्यात आला होता. हा भाग हद्दवाढ म्हणून ओळखला जातो. या परिसरात गेल्या 28 वर्षांपासून ड्रेनेजची अपुरी व्यवस्था आहे. या भागात अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र ड्रेनेज व्यवस्था नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे स्वछ भारत अभियानाचा डंका वाजवला जातो, तर दुसरीकडे अपुऱ्या कामगार व्यवस्थेमुळे स्वछ भारत अभियाची थट्टा होत आहे. नीलम नगर, नइ जिंदगी, विजापूर नाका, आदी हद्दवाढ भागातून सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यासाठी जास्त प्रमाणात अर्ज येत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सेफ्टी टॅंक सफाई कामगारांचा तुटवडा
शहरात सेफ्टी टॅंक स्वछ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने, स्वच्छतेच्या कामात दिरंगाइ होत आहे. शहराच्या मलमूत्र निस्सारण विभागात फक्त 12 ते 15 कर्मचारी काम करतात. सोलापूर शहराची लोकसंख्या 10 ते 12 लाख असून, एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी फक्त तीन टॅंकर आणि काही मोजकेच सफाई कामगार असल्यामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी देखील या तीन टँकरवरच आहे.