सोलापूर -बीड, अहमदनगर, सोलापूरातील करमाळ्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाला अपयश आले आहे. चिकलठाणा परिसरात उसाच्या फडातून शार्प शुटर्सला चकवा देत बिबट्या पसार झाला.
वन विभागाकडून बिबट्याला ठार मारण्याचा प्रयत्न फसला
मानव आणि वन्यप्राणी संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते आहे. यात प्रामुख्याने बिबट्या आणि मानव यांचा संघर्ष जास्त आहे. गेल्या पंधरा दिवसात एका नरभक्षक बिबट्याने बीड, अहमदनगर, सोलापूरातील करमाळ्यामध्ये एकूण दहा जणांचा बळी घेतला आहे.
चिकलठाणा परिसरात हा नरभक्षक बिबट्या वास्तव्यास असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी वनाधिकारी, शार्प शूटर, गन मॅन यांनी ऊसात जाऊन पाहणी केली. त्याचवेळी बिबट्याने एका केळीच्या शेतामध्ये आश्रय घेतला. त्यावेळी शार्प शुटरने केळीच्या बागेत फायरिंग करून बिबट्याला मारण्याचा प्रयत्नन केला. मात्र, बिबट्याने पुन्हा उसाच्या फडात धूम ठोकल्यामुळे बिबट्याला मारण्यात अपयश आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या शिरलेल्या उसाच्या फडाला आग लावली. आग लावताच बिबट्याने पुन्हा केळीच्या बागेत पळ काढला. यामुळे वनविभागाचे त्याला मारण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. यावेळी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे उपस्थित होते. या बिबट्याला मारण्यासाठी डॉ. चंद्रकांत मंडलिक या शार्प शूटरची मदत घेण्यात आली होती. यांच्यासह पाच गन मॅन बिबट्याला मारण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. आज रात्री पुन्हा सर्च ऑपरेशनद्वारे बिबट्याला मारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
करमाळा तालुक्यात तीन बळी -
करमाळा तालुक्यात रायगाव जवळच्या फुंदे वस्तीवरील तरुण शेतकरी कल्याण फुंदे व दुसऱ्या दिवशी अंजनडोह येथील जयश्री शिंदे ही विवाहिता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. तर चिखलठाणा येथील आठ वर्षाची मुलगी बिबट्याची तिसरी शिकार ठरली. त्यामुळे करमाळा तालुक्यात आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे संपूर्ण करमाळा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी, ग्रामस्थ यांना बिबट्यापासून कोणताही धोका होऊ नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.