महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौटुंबिक न्यायालयाने व्हॉट्सअ‌ॅपद्वारे बजावली नोटीस, वाचा संपूर्ण प्रकरण - solapur family court

कौटुंबिक न्यायालयाने सोशल मीडियाचा उपयोग करत एका महिलेला व्हॉट्सअ‌ॅपद्वारे नोटीस बजावली आहे. सोलापूर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी हा आदेश बजावला आहे.

The family court issued the notice via WhatsApp
कौटुंबिक न्यायालयाने व्हाट्सअ‌ॅपद्वारे बजावली नोटीस, वाचा संपूर्ण प्रकरण

By

Published : Aug 27, 2020, 7:36 PM IST

सोलापूर - येथील कौटुंबिक न्यायालयाने सोशल मीडियाचा उपयोग करत एका महिलेला व्हॉट्सअ‌ॅपद्वारे नोटीस बजावली आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी हा आदेश बजावला आहे. आपल्या तीन वर्षाच्या मुलाच्या ताब्यासाठी पतीने पत्नी विरोधात याचिका दाखल केली होती. त्या पत्नीचा पत्ता माहीत नसल्याने कोर्टाने व्हाट्सअ‌ॅपचा उपयोग करून नोटीस बजावली आहे.


अमोल दिनकर चवरे यांनी सोलापूर येथील कौटुंबिक कोर्टात पत्नी विरोधात घटस्फोटाचा खटला दाखल केला होता. अमोल दिनकर चवरे यांचा विवाह 2012 साली झाला होता. ती महिला परजिल्ह्यात राहावयास आहे. या दोघा दाम्पत्यास तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. काही कौटुंबिक वादामुळे दोघे विभक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पत्नी, मुलाला घेऊन निघून गेली आहे. घटस्फोट मिळावा व मुलाचा ताबा मिळावा असा अर्ज अमोल चवरे यांनी सोलापूर कौटुंबिक न्यायालयात दाखल केला आहे.

अ‌ॅड. गुरुदत्त बोरगावकर माहिती देताना...

अमोल चवरे यांनी अ‌ॅड गुरुदत्त बोरगावकर यांच्या मार्फत सोलापूर येथील न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज व मुलाचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. हिंदू विवाह कायद्याततील कलम 26 नुसार मुलाचा ताबा मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला होता. या खटल्याची नोटीस त्या महिलेला देणं बंधनकारक होते. परंतु ती महिला माहेरी देखील राहत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. शेवटी वकिलांमार्फत युक्तिवाद मांडत व्हॉट्सअ‌ॅपच्या सहाय्याने त्याला नोटीस देण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु न्यायालयाने ही मागणी मान्य न करता बेलीफ यांना आदेश दिला की, त्या महिलेला मोबाईल फोनद्वारे संपर्क करून त्याचा पत्ता विचारून त्याला नोटीस बजावण्यात यावी.

कोर्टातील बेलीफ यांनी याबाबत हालचाली करून त्या महिलेला संपर्क केला असता तिने उडवाउडवीची उत्तरे देत पत्ता सांगितला नाही. तसा अहवाल बेलीफ यांनी कोर्टात सादर केला. अखेर 24 ऑगस्ट 2020 रोजी कौटुंबिक न्यायालयाने सोशल मीडियाचा वापर करत व्हॉट्सअ‌ॅपद्वारे त्या महिलेला नोटीस बजावली आहे. या खटल्यात याचिकाकर्त्यातर्फे अ‌ॅड. गुरुदत्त बोरगावकर, अ‌ॅड. देवदत्त बोरगावकर, अ‌ॅड. विश्वनाथ शिंदे, अ‌ॅड तेजस्विनी शिंदे हे काम पाहत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details