सोलापूर-राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.बुधवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांची धांदल तर उडालीच पण मुक्या प्राण्यांना देखील पावसाने झोडपून काढले.धुव्वादार पावसापासून स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एक गाढव खोल खड्ड्यात जाऊन पडले. प्राणी मित्रांच्या सहकार्याने या गाढवाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
ही घटना बुधवारी 14 ऑक्टोबर 2020 रोजी घडली. निलमनगर भागातील विजयनगर परिसरातील एका चेंबर खड्यात गाढव पडले. दिपक फुलारी यांनी फोनवरून सर्व माहिती प्राणी मित्र सुनिल अरळ्ळीकट्टी यांना दिली. सुनिल अरळ्ळीकट्टी व धानप्पा जवळकोटे घटनास्थळी पोहचले.
प्राणी मित्रांनी वेळ वाया न घालवता गाढवास सुखरूप खड्यातुन बाहेर काढले. गाढवाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी 3 ते 4 तास परिश्रम घेतले. सुनिल अरळ्ळीकट्टी यांनी पुढील धोका ओळखून सदर स्थानिक नागरिकांना चेंबरला झाकण लावून घेण्याच्या सुचना दिल्या.