सोलापूर -कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्याची गरज असल्याची अनेकांची मागणी असून महापौरांनी दहा दिवसाच्या टाळेबंदीची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोलापुरातील वरिष्ठ अधिकारी याबाबत चर्चा करुन शनिवारी (दि. 11 जुलै) टाळेबंदी बाबत निर्णय घेतील, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शुक्रवारी (दि. 10 जुलै) पालकमंत्री भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेत कोरोनासह इतर बाबींचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आदी अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाची साखळी तोटण्यासाठी टाळेबंदी करणे गरजेची आहे. पण, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त घेतील. ही टाळेबंदी सक्ती असणार असून या टाळेबंदी कोणत्या सवलती देण्यात येतील व कोणती सक्ती असेल याबाबत आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. टाळेबंदीपूर्वी तिन ते पाच दिवसांचा वेळ देण्यात येईल, असेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.