सोलापूर :बार्शी शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यांने स्टिंग करून बाहेर काढली होती. यावर जिल्हाभरातुन प्रतिक्रिया येत होत्या. आज गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाह मेडिकल (बार्शी) येथे जाऊन कारवाई केली आहे. तसेच त्या मेडिकल दुकानाची चौकशी करून त्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट मेडिकल दुकानदाराला दाखवणे आवश्यक
रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करताना रुग्णाच्या नातेवाईकांनी मेडिकल दुकानदाराला रुग्णांचे आधार कार्ड, डॉक्टरांची चिट्टी आणि कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे. मेडिकल दुकानदारांनी या तिन्ही कागदपात्रांची झेरॉक्स प्रत आपल्या फाईलला लावून ठेवणे, अशी नियमावली आहे. पण ही नियमावली पायदळी तुडवत मेडिकल दुकानदार एमआरपी दराने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करत आहेत. असाच एक प्रकार बार्शीत उघडकीस आला आहे. शहा मेडिकल दुकांनधारकाने कोणतेही कागदपत्रे न मागता फक्त डॉक्टरांच्या चिट्टीवर 4 हजार रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शन विक्री केल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर शहरात मेडिकलमध्ये 800 ते 1000 रुपयांत रेमडेसिवीर उपलब्ध
गेल्या आठवड्यापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भयंकर वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनावरील औषधसाठा कमी पडत आहे. त्यात भर म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ड्रग इन्स्पेक्टर यांनी दिलेल्या सुचनेनुसार, सोलापुरातील मेडिकल दुकानाबाहेर रेमडेसिवीर इंजेक्शनचे दरफलक लावले आहेत. 800 ते 1000 रुपये या किंमतीत रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.
ड्रग इंस्पेक्टरचे दुर्लक्षच-
सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी फक्त एकच औषध अधिकारी उपलब्ध आहे. ड्रग इंस्पेक्टर नामदेव भालेराव असे त्यांचे नाव आहे. जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या होत असलेल्या साठेबाजीवर किंवा काळ्याबाजारावर या अधिकऱ्याचे लक्षच नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी दोन ड्रग इंस्पेक्टर सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध होते. पण गेल्या वर्षी त्यांची बदली झाल्यापासून नवे अधिकारी बदलून आले नाहीत.
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या तक्रारीमुळे औषध अधिकाऱ्यांचा बदल्या
सोलापुरात गेल्या वर्षी 26 जून 2020 रोजी सोलापुरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषद घेऊन सोलापुरातील भ्रष्ट औषध अधिकऱ्यांचा माध्यमांसमोर पाढा वाचला होता. राज्यशासनाने याची गंभीर दखल घेत अन्न व औषध अधिकऱ्यांची बदली केली होती. तेव्हापासून आजतागायत एकाच ड्रग इन्स्पेक्टरवर जिल्ह्याचा कारभार आहे.
ड्रग इंस्पेक्टर भालेराव यांनी देखील तोच कित्ता गिरविला
सोलापुरात यापूर्वीच्या औषध अधिकऱ्यांनी एका संतोष वळसंग नावाच्या खासगी दलालामार्फत मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने केला होता. काही दिवसांसाठी हा खासगी दलाल सोलापुरातुन गायब झाला होता. पण काही महिन्यांनी संतोष वळसंग सोलापुरात पुन्हा सक्रिय होऊन ड्रग इंस्पेक्टर नामदेव भालेराव यांसोबत औषध परवाने देण्याची दलाली करू लागला. या दलालीमधून भली मोठी रक्कम मिळत असल्याने नामदेव भालेरावांचे कोरोना महामारीकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे, असे बार्शितील सामाजिक कार्यकर्ते व होलसेल औषध विक्रेता राजन ठक्कर यांनी म्हटले आहे.
स्टिंग ऑपरेशन नंतर कारवाई-
तक्रार नंतर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासन सहायक आयुक्त आणि तहसीलदार यांनी स्वतः बार्शीत जाऊन पाहणी केली. स्टिंग ऑपरेशनमध्ये शाह मेडिकल दुकानदाराने रेमडेसिविर इंजेक्शन 4 हजार रुपयांना विक्री केले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करताना कोविड पॉजीटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट, त्याचा आधार कार्ड आणि डॉक्टरांची चिट्टी घेणे आवश्यक असताना शाह मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याने कोणतेही कागदपत्रे न घेता 4 हजार रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शन विक्री केले होते. त्याचा व्हिडीओ वायरल होताच प्रशासनाने कारवाई केली आहे.
मेडिकल दुकान चालकाची बाजू ऐकून होणार कारवाई -
वायरल झालेल्या व्हिडीओत मेडिकल दुकान धारकाच्या रेमडेसिवीर औषध विक्री विविध त्रुटी आढळल्या तसेच रेमेडीसिवीर इंजेक्शन कागदपत्रे विना विकल्याने शाह मेडिकलची खरेदी विक्री पुढील आदेशपर्यंत बंद केली आहे. यासंदर्भात मेडिकल चालकाची बाजू ऐकून मेडिकल परवाना रद्द किंवा निलंबित करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. अन्न व औषध विभागात एकाच अधिकाऱ्यावर जबाबदारीगेल्या एक वर्षापासून अन्न व औषध प्रशासन विभागात एकच अधिकारी काम करत आहेत. त्यांची मूळ पोस्ट ही ड्रग इन्स्पेक्टरची आहे. पण आयुक्त, सहाय्यक आयुक्त या सर्व जबाबदाऱ्या ड्रग इन्स्पेक्टर नामदेव भालेराव बजावत आहेत. आज बार्शीत शाह मेडिकल या दुकानावर भालेराव यांनी कारवाई केली आहे.
हेही वाचा -मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद, परीक्षेला जगण्या-मरण्याचा प्रश्न समजू नका
हेही वाचा -महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचा 'मिनी लॉकडाऊन'ला विरोध