सोलापूर - कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 107 माता कोरोनाग्रस्त होत्या. यातील शंभरावी माता शनिवारी (दि. 5 सप्टें) कोरोनामुक्त झाली. या शंभराव्या मातेची पाठवणी प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल यांनी फुलांचा वर्षाव करुन, साडीचोळीचा आहेर देत त्या मातेला डिस्चार्ज दिला.
सोलापुरात 12 एप्रिल, 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सोलापूर येथे कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून आजतागायत 2 हजार 503 मातांनी बालकांना जन्म दिला. त्यापैकी 107 माता या कोरोनाग्रस्त होत्या. त्यातील 100 कोरोनाबाधित माता आजपर्यंत कोरोनामुक्त होऊन सुखरुपपणे घरी गेल्या आहेत. यापैकी 8 मातांची नवजात बालके कोरोनाबाधित होती, ती सुध्दा कोरोनामुक्त होऊन घरी गेली आहेत. या शंभरपैकी 61 मातांना सिझेरियन करावे लागले तर 39 मांताची प्रसूती नॉर्मल झाली आहे.