मुंबई/सोलापूर -तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे मंगळवारी सोलापुरातील पंढरपूर येथे दाखल होणार आहेत. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. केसीआर यांच्या दौऱयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. पंढरपूर दौऱ्यानिमित्ताने केसीआर यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपला पक्ष रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पश्चिम महाराष्ट्राची विविध अंगांनी समृद्धी पाहता केसीआर यांनी आपला मोर्चा आता तिकडे वळवला असल्याचे बोलले जात आहे.
केसीआर यांना का आहे आशा? - महाराष्ट्रातील सध्याची राजकीय अस्थिरता आणि शेतकरी- मजूर यांची असलेली नाराजी पाहता बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीला संधी असल्याचे राव यांना वाटत आहे. तेलंगाणामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज आणि पाणी या दोन महत्त्वाच्या गरजा पुरवल्यानंतर शेतकरी कामगार वर्ग हा बीआरएसच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यामुळेच तेलंगाणामध्ये चंद्रशेखर राव हे सत्तास्थानी आहेत. महाराष्ट्रातील किंवा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवायचे असेल तर या दोन महत्त्वाच्या बाबी त्यांना दिल्या तर ते आपल्याकडे वळतील याचा अंदाज असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला वळवण्यासाठी केसीआर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
केसीआर यांचे पश्चिम महाराष्ट्र मिशन -केसीआय यांनी मराठवाड्यासह विदर्भातही जाहीर सभा घेतल्या होत्या. या सर्व सभांना प्रतिसाद मिळाला असला तरी अद्यापही पक्षाची पाळमुळं रुजलेली नाहीत याची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्रामध्ये अधिक जोरदारपणे जर आपली पाळंमुळे रुजवायची असतील तर राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेल्या साखरपट्ट्याकडे मोर्चा वळवायला हवा, हे लक्षात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केसीआर यांनी सुरू केला असल्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड सांगतात.
राजकीय विश्लेषकांच्या प्रतिक्रिया -
महाराष्ट्रामध्ये अधिक जोरदारपणे जर आपली पाळंमुळे रुजवायची असतील तर राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेल्या साखरपट्ट्याकडे मोर्चा वळवायला हवा, हे लक्षात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केसीआर यांनी सुरू केला - ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड
महाराष्ट्रातील राजकारणाला धक्का द्यायचा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा पदरात पाडून घ्यायला हव्यात हे लक्षात आल्यानंतर केसीआर यांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला असावा - ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी
केसीआर यांनी पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोमाने काम करत आहे. जर येथील काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही नेते केसीआर यांच्या गळाला लागले तर चित्र वेगळे असेल हे नक्की - ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार
पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय स्थिती - पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण उभे आहे. या साखर कारखान्यांच्या आणि सहकार क्षेत्राच्या राजकारणामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होत असते. अलीकडे शिवसेनेनेही या जिल्ह्यांमध्ये आपला प्रभाव पाडायला सुरुवात केली असली तरी प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच या जिल्ह्यांमध्ये प्रबळ होती. महाराष्ट्रातील राजकारणाला धक्का द्यायचा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा पदरात पाडून घ्यायला हव्यात हे लक्षात आल्यानंतर केसीआर यांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला असावा, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले.
काँग्रेस, NCP तील नेते बीआरएसच्या संपर्कात - सध्या तरी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीचे नेते केसीआर यांच्या संपर्कात आहेत. मात्र, महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढवणार असेल तर अनेक नेते नाराज होण्याची शक्यता आहे. नेत्यांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काही नेते हे केसीआर यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा एकूणच महाविकास आघाडीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत राजकीय विश्लेषक जोशी यांनी व्यक्त केले आहे.आने
बीआरएसमध्ये पक्षप्रवेश वाढला - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. भालके आता तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहेत. याशिवाल मागील काही महिन्यात बीआरएसमध्ये महाराष्ट्रातील अनेक नावाजलेली लोकं दाखल झाली आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर, भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.
राजकारण्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रा का महत्वाचा -पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे हे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांचा वरचष्मा आहे. विधानसभेच्या 75 जागा या नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात पडल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार करता या पाच जिल्ह्यातील दहा ते बारा लोकसभेच्या जागा अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. या जागांवर पकड मिळवण्यासाठी महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करीत असताना केसीआर यांचा या भागात झालेला प्रवेश आणि जर त्यांच्याकडे महाविकास आघाडीतील काही नाराज नेते आकृष्ट झाले, तर हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असणार आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे. एकूणच केसीआर यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील खेळीला कसा प्रतिसाद मिळतो यावर राज्यातील आगामी निवडणुकांचे राजकारण अवलंबून असणार आहे. सध्या तरी केसीआर यांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मात्र निवडणुका जवळ येतील तसे चित्र बदलू शकते, असेही राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया -
तेलंगणाचे मुख्यमंत्री संपूर्ण कॅबिनेटसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. पंढरपुरात कोणीही येऊ शकते. भक्तीभावाने जरूर या, पण राजकारण करण्यासाठी कोणी येऊ नये - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आगामी काळात केसीआर आव्हान निर्माण करतील का हे निवडणूकीतच दिसेल. केसीआर यांनी महाराष्ट्रातील कांद्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु, संपूर्ण राज्याचा विचार केला तर कांदा हे पीक फक्त पश्चिम महाराष्ट्रात होते. नाशिक, धुळे व तीन चार जिल्ह्यात जिरायत शेतकरी कांदा पीक घेतात. अशा बातम्या आल्या होत्या की येथील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी हैदराबादला नेला. परंतु, तेथे त्यांची फजिती झाली. त्यामुळे हे थोडे राजकीयदृष्ट्या वेगळे चित्र आहे - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
केसीआर यांची राजकीय खेळी - मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पक्षात येण्याचं आवाहन करत असताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा केसीआर यांचा प्रयत्न आहे. तेलंगाणा राष्ट्र समितीचे नाव बदलून त्यांनी भारत राष्ट्र समिती केले आहे. देशाच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपाला पर्यायी सरकार देण्याचा केसीआर यांचा मानस दिसून येत आहे. या लढाईची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुका बीआरएस लढवणार आहे. भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्याची रणनीती आखत आहेत, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -
- KCR Maharashtra visit update: तेलंगणाचे मुख्यमंत्री हैदराबादहून रवाना, सुमारे ६०० वाहनांच्या ताफ्यासह येणार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!
- Solapur News: केसीआर यांना सोलापुरी 'शिक कबाब' खाऊ घालू, सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्य
- Devendra Fadnavis on KCR : केसीआर येणार विठ्ठलाच्या दर्शनाला; फडणवीस म्हणाले, भक्तीभावाने या, पण...