सोलापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या 600 वाहनांचा ताफा दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहे. सोमवार, मंगळवार असे दोन दिवस सोलापुरातील विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 600 गाड्यांच्या ताफा सोलापुरात पहिल्यांदाच आला आहे. आलिशान गाड्या सोलापुरातील रस्त्यावरून जातांना सोलापूरकर तोंडात बोट घालून पाहत होते. आलिशान गाड्यांने नंबर प्लेटकडे काही मोजक्याच जणांचे लक्ष गेले. सर्व वाहनांचे नंबर प्लेट एकच पहायला मिळाले, ते म्हणजे TS -09-6666.
सुरक्षेच्या कारणास्तव एकच नंबर प्लेट :के चंद्रशेखर राव यांच्या वाहनांचा ताफा सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये सोमवारी रात्री मुक्कामास होता. हॉटेल परिसरात आलिशान गाड्यांचा थांबलेला ताफा नागरिकांचे लक्ष वेधुन घेत होता. या वाहनांकडे बारकाईने लक्ष दिले असता, सर्व वाहनांवर एकाच क्रमांकाची नंबर प्लेट दिसत होती. ताफ्यातील वाहन चालकांना याबाबत अधिक माहिती विचारली असता, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वाहनांना एकच क्रमांक आहे. मुख्यमंत्री कोणत्या वाहनांत बसलेत हे अधिक लोकांना कळू नये म्हणून, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वाहनचालकांनी दिली.
जोरदार घोषणाबाजी : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक बस आणि 600 हून अधिक गाड्या आहेत. सोलापूरला जाणाऱ्या टीममध्ये जवळपास सर्वच आमदार, खासदार, मंत्री यांचा समावेश आहे. हैदराबादहून सकाळी प्रगती भवनातून निघालेल्या बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंढरपूर, तुळजा भवानी मंदिरांना भेट देण्यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरातील विणकाम उद्योग, हातमाग युनिटला भेट देणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके सोलापुरात बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.