पंढरपूर (सोलापूर) -आंबे येथील भीमा नदीपात्रातून अवैधरित्या उपसा केलेला वाळू प्रकरणी तहसीलदार सुशील बेल्हेकर व त्यांच्या नियुक्त केलेल्या पथकाने कारवाई केली. त्यांनी उपसा केलेला वाळू साठा ताब्यात घेतला. तसेच, दीड लाख रुपये किंमतीच्या 6 होड्याही जागेवरच नष्ट केल्या. तर 1 लाख रुपये किंमतीची 20 ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोडाऊन येथे आणण्यात आली. याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
वाळू माफियांना जरब बसणार
तालुक्यातील आंबे व पोहोरगाव दरम्यानच्या भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता. याची माहिती मिळताच तहसीलदार सुशील बेल्हेकर हे कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन पोहोरगाव येथे गेले. याचा सुगावा लागताच तेथे वाळू उपसा करणारे नदीपार करून आंबे हद्दीत गेले. तहसीलदार व कर्मचारीही स्पीड बोटचा वापर करत नदीच्या पलीकडे आंबे या ठिकाणी पोहोचले. तेथे बोटीद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले. अधिक पाहणी केली असता नदीपात्राबाहेर काठाला 1 लाख रुपये किंमतीचा 20 ब्रास वाळू साठा आढळून आला. तो साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.