सोलापूर -जिल्ह्यातल्याएका छोट्याशा खेड्यातील रणजितसिंह डीसले या शिक्षकामुळे भारतातील एनसीआरटी आणि महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या बालभारती विभागाने आपल्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड पद्धत लागू केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना याचा भरपूर लाभ मिळत आहे. मोबाईल किंवा स्मार्ट फोनमध्ये पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोड स्कॅन करताच पुस्तकातील सर्व अभ्यासक्रम मोबाईलमध्ये दिसत आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने डीसले गुरुजींसोबत संवाद साधला आहे.
...आणि सुचली क्यूआर कोडची संकल्पना -
रणजितसिंह डीसले हे सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून भरती झाले. खेड्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण कसे देता येईल, यावर त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यासाठी डीसले गुरुजी मोबाईलमध्ये व्हिडीओ रिकोर्ड करून, लॅपटॉपद्वारे किंवा सोशल मीडियामधून ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत होते. 2018मध्ये ते बाजारात काही वस्तू खरेदीसाठी गेले होते. तेथे त्यांनी सर्वात पहिल्यांदा क्यूआर कोड पाहिला. दुकानदार आपल्याला ज्याकाही वस्तू दिल्या आहेत, त्या वस्तूंवरील क्यूआर कोड त्याने स्कॅनरने स्कॅन केल्या. स्कॅन केल्याबरोबर संबंधित वस्तूची सर्व माहिती समोर आली होती. त्यावरून रणजीतसिंह डीसले यांना पाठ्यपुस्तकांमध्येदेखील क्यूआर कोड संकल्पना आणून पाठ्यपुस्तकाची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर मोबाईल किंवा लॅपटॉप, संगणकावर दिसावी, अशी संकल्पना सुचली.
एनसीआरटीने घेतली दखल -
सोलापूर जिल्हा परिषदेच्या माढा तालुक्यातील परितेवाडी या गावात रणजितसिंह डीसले वाड्या वस्त्यांवरील गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देत होते. क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली. त्याचा फायदा कसा होणार याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना पटवून सांगितले. एनसीआरटीच्या शिक्षकांनी व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड पद्धत लागू केली. सीबीएसईमधून शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू लागला. त्यांनतर लगेच बालभारती पाठ्यपुस्तकांमध्येदेखील क्यूआर कोड सुरू झाले.