सोलापूर- संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या उपाययोजना तात्काळ सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांची जनावरे शासकीय कार्यालयात आणून आंदोलन करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर यांनी दिला आहे. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. यात शेतकरी वर्ग होरपळून गेला आहे.
'दुष्काळी उपाययोजना तात्काळ करा, नाहीतर जनावरे शासकीय कार्यालयात आणून सोडू' जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्यामध्ये जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असल्या तरीही इतर भागांमध्ये मात्र चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. चारा छावण्यांना मंजुरी देत असताना प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने निष्कर्ष काढले असल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर यांनी केला आहे.
माढा तालुक्यामध्ये पाच साखर कारखाने असल्यामुळे या तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे आणि जास्त असल्यामुळे तालुक्यात चारा छावणी सुरू करता येत नसल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे या तालुक्यात चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. तसेच अनेक गावात टँकरची मागणी असून देखील टॅंकर सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप घाटणेकर यांनी केला आहे. संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत असताना प्रशासनाने सर्वांना सारखा न्याय देत दुष्काळाच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांची सर्व जनावरे घेऊन शासकीय कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
करमाळा आणि माढा या तालुक्यामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र होत असतानादेखील प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. राज्यातील मोठ्या असलेल्या धरणांपैकी एक उजनी धरण करमाळा नियमा दोन तालुक्यात पसरलेले आहे. उजनी धरणाचे बॅकवॉटर तसेच सीना माढा जोड कालवा असतानादेखील या दोन तालुक्यांना दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. माढा तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे त्यामुळे प्रशासनाने या भागात तात्काळ दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.