सोलापूर- सोलापुरातील सफाई कामगाराचा मुलगा असलेल्या कुणाल वाघमारे यांनी न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे स्वप्न उराशी त्यांनी बाळगले होते, आज ते स्वप्न साकार झाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल शनिवारी (दि. 21 डिसें) रात्री घोषित झाला. यात कुणाल वाघमारे 200 पैकी 158 गुण मिळवत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. कुणाल यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा - सोलापूरची शेतकरीकन्या न्यायदंडाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम
कुणाल वाघमारे हे रमाबाई आंबेडकर नगरात राहतात. त्यांचे वडील कुमार आणि आई नंदा दोघेही सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार आहेत. आपल्या मुलाने न्यायाधीश व्हावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मुलाला शिक्षणात कोणत्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत. त्यांच्या मुलाने देखील आई वडीलांच्या कष्टाची चीज केले. मुलाचे हे यश पाहून आज त्यांच्या डोळ्यांत आनंदअश्रू आले.
कुणाल यांनी प्राथमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 21 आणि शाळा क्रमांक 2 येथून तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय सोलापूर येथून पूर्ण केले. भाई छन्नुसिंह चंदेल महाविद्यालयातून सामाजिक कार्याची पदवी घेतली. त्यानंतर दयानंद विधी महाविद्यालयातून सन 2014 एल.एल.बी. उत्तीर्ण होत सोलापूर विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळवला हेता. 2016 साली एल.एल.एम. पूर्ण करत सोलापूर विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.