सोलापूर- गाईच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जनावरांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. यावेळी, ही आंदोलनाची सुरुवात असून संपूर्ण राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे. अनुदान देत असताना ते थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत. त्यामुळे यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. सध्या राज्यात ५२ लाख लिटर दूध अतिरिक्त असून हे दूध १५ ते १६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. हा दर दूध उत्पादकांना परवडणारा नाही, त्यामुळे राज्य शासनाने व केंद्र सरकारने यासाठी ५ रुपये प्रतिलिटर थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. तसेच, दूध बुकटी निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. आणि दूध बुकटीची आयात तात्काळ थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.