पंढरपूर (सोलापूर) -मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक 14 टक्के दरवाढ द्यावी, या मागणीसाठी तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी (दि. 18 डिसें.) तलवारी दाखवत आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न अज्ञताकडून झाला. त्यानंतर शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते कारखाना परिसरात दाखल झाले. आज (दि. 20 डिसें.) कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या घेत कारखाना बंद पाडाला. मागणी पूर्ण होईपर्यंत कारखाना सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
कारखान्यांनी एफआरपी जाहीर करावी
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मरवडे येथे ट्रॉली जाळण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता. तसाच प्रकार शेतकऱ्यांकडून बालाजीनगर येथेही झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक घेत त्या बैठकीत 15 डिसेंबरपर्यंत याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 16 डिसेंबरनंतर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात आंदोलन सुरू केले.