महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sushma Andhare VS Jyoti Waghmare : सुषमा अंधारेंना टक्कर; शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांची राज्य प्रवक्तेपदी निवड - ज्योती वाघमारे राज्य प्रवक्तेपदी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकाकी पडलेल्या उध्दव शिवसेनेला सावरण्यात सुषमा अंधारे यांनी मोलाचे योगदान दिले होते. उध्दव सेनेच्या प्रवक्तेपदाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न अंधारेंनी केला. त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आता सोलापूरच्या पडॉ. ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Sushma Andhare VS Jyoti Waghmare
सुषमा अंधारे विरूद्ध ज्योती वाघमारे

By

Published : Apr 16, 2023, 2:58 PM IST

सोलापूर : ज्योती वाघमारे यांना आता मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. अंधारे यांना राज्यात टक्कर देण्यासाठी वाघमारेंना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आता सोलापूर जिल्ह्यासह राज्यात रंगली आहे. ज्योती वाघमारे यांनी माहिती देताना सांगितले की, अंधारे विरुद्ध वाघमारे असे नसून ही विचारांची लढाई आहे. एका स्त्री विरोधात स्त्री नसते तर, संघर्ष हा विचारांचा असतो असे ज्योती वाघमारे म्हणाल्या.

वाघमारेंचा राजकीय प्रवास :ज्योती वाघमारे यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. अगदी गरीब कुटुंबात यांचा जन्म झाला. वडील नागनाथ वाघमारे यांनी कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी वीटभट्टी कामगार म्हणून काम केले तर कधी गाढव राखली. तर हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. नागनाथ वाघमारे यांनी दलित पँथरमध्ये प्रवेश केला. घरात राजकीय वातावरण निर्माण झाले. आई सावित्री वाघमारे यांनी देखील काबाडकष्ट करत टॉवेल व चादरीच्या कारखान्यात काम केले. वडीलांमुळे राजकारणात आवड निर्माण झाल्याची माहिती ज्योती वाघमारेंनी दिली. शिक्षण सुरू असताना ज्योती यांची विद्रोही सांस्कृतिक चळवळ, मानवी हक्क अभियानमधून सुरुवात झाली. सोलापुरातील सुशीलकुमार शिंदे कुटुंबीयांशी अगदी कौटुंबिक संबंध निर्माण झाले.

हिंदुत्वाचे खंदे समर्थक :2014 मध्ये सोलापूर शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष देखील झाल्या. दीड वर्षातच काँग्रेस सोडली. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. ज्योती वाघमारेंनी सोलापूर शहरातील वालचंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरी करत असताना, सेट, नेट, जेआरएफ आणि पीएचडी केली. तेलगू, कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषांवर मजबूत पकड निर्माण केली. राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाला, मिंधे गट, किंवा गद्दार गट असे म्हटले जाते, यावर ज्योती वाघमारे यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. आम्ही मिंधे नाहीत तर बाळासाहेबांचे सच्चे बंदे आहोत. हिंदुत्वाचे खंदे समर्थक आहोत. खरी गद्दारी ही विचारांची असते, ज्यांनी सत्तेसाठी सिल्वर ओक आणि सोनिया गांधी समोर लोटांगण घातले. त्या बोक्यांनी खोक्यांची भाषा करूच नये, अशी ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली.


म्हणून राजीनामा दिला :ज्योती वाघमारे या काँग्रेसच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जात होत्या. आमदार प्रणिती शिंदे यांच्या देखील जवळच्या मैत्रीण आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध असलेल्या ज्योती वाघमारे शिंदे गटात सक्रिय होत आहेत. यामुळे सोलापुरातील काँग्रेसला देखील धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या राज्याच्या प्रवक्ते पदावर त्यांची नियुक्ती होणार आहे. काँग्रेसच्या संस्कृतीत किंवा काँग्रेसमधील राजकारण मला पटले नाही म्हणून 2016 सालीच काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याची माहिती ज्योती वाघमारे यांनी बोलताना दिली. शिंदे गटाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसेना किंवा महाविकास आघाडीला उत्तर देण्याचे काम वाघमारेच्या समोर आले आहे.

हेही वाचा : Sushma Andhare : 'दादा लाव रे व्हिडिओ' म्हणत सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details