सोलापूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर आता राज्यातील आमदारांना मंत्रिपदाची आशा लागून राहिली आहे. आमदारांचे समर्थक पक्ष प्रमुखांकडे आपआपल्या नेत्याला मंत्रिपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यात माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनाही मंत्रिपद मिळावे, याची मागणी कार्यकर्ते व समर्थक करत आहेत.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बबनराव शिंदे याना संधी मिळण्यासाठी शिंदे समर्थकांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे साकडे घातले आहे. मुंबई येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ व एकनिष्ठ आमदार त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात यावी, असे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. तसेच भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळाला पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाविकास आघाडीची मंत्रिपदाच्या निवडी जाहीर करण्याच्या संदर्भात अगोदर बैठक होईल, या बैठकीत आपल्या मागणीचा विचार करू, असे देखील पवारांनी आश्वासित केले आहे.
हेही वाचा - जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत करमाळ्यातील खेळाडूंचे यश