सोलापूर- लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कारखाने आणि घरगुती ग्राहकांना महावितरणने भरमसाठ बिले पाठवली आहेत. कोरोनाच्या महामारीतून अद्याप कारखाने आणि सर्वसामान्य माणूस बाहेर आलेले नाहीत. तरीही वाढीव बिले कमी करुन आकारण्यात यावीत अन्यथा भाजपच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्यावतीने माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी महावितरण आणि जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
वाढीव वीज बिले तात्काळ कमी करावीत;अन्यथा आंदोलन करण्याचा सुभाष देशमुखांचा इशारा - subhash deshmukh news
लॉकडाऊन काळात वाढवण्यात आलेली वीज बिले कमी करावीत याबाबतचे निवेदन माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी महावितरण आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. वीज बील कमी केले नाहीतर जिल्ह्यात सर्वत्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
कारखानदार आणि घरगुती ग्राहकांना वाढीव बिले दिल्याबद्दल बुधवारी माजी मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख यांनी महावितरणच्या कार्यालयात अधीक्षक अभियंता पडळकर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना सुभाष देशमुख म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत कारखाने, उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद होते. अद्यापही काही उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य माणूसही घरातच बसून होता. अशा परिस्थितीत महावितरणने प्रतिमहा आकारण्यात येणार्या बिलांच्या तुलनेत अधिक वीज बिले कारखाना आणि ग्राहकांना दिली आहेत.
विजेचे दरही 1 एप्रिलपासून वाढवले आहेत. लॉकडाऊनमुळे अगोदरच सर्वसामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरीही त्यांना बिले भरण्याचा आग्रह केला जात आहे. तरी महावितरणने वाढीव बिले कमी करुन आकारावीत, अशी आमची मागणी आहे. महावितरणने बिले कमी केली नाहीत तर भाजपच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम आदी उपस्थित होते.