सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्य कार्यालयावर गुरुवारी (1 जुलै) दुपारी शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके यांनी दगडफेक केली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर बुधवारी (30 जून) दगडफेक झाली. यानंतर सोलापुरातील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केल्याची अधिकृत माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे ऑफिस बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही. खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात आणले आहे.
दगडफेक करणारे दोघेही पडळकरांचे समर्थक
शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके हे दोघेही भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक आहेत. सोलापुरात बुधवारी सायंकाळी मड्डी वस्ती येथे पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली होती. याबाबत अमित सुरवसे आणि निखिल क्षीरसागर या दोघांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करणारे दोघेही अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण आज (1 जुलै) दुपारी शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके या पडळकर समर्थकांनी राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हा मुख्य कार्यालयावर दगडफेक केली. ते दुपारी कार्यालयासमोर आले. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणा करून दगडफेक करू लागले. त्यानंतर काही वेळाने फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पडळकरांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद -
सोलापूर शहरातील राजकारण काल रात्रीपासून तापले आहे. याचे पडसाद आज पहावयास मिळाले. सोमनाथ घोडके आणि शरनू हांडे यांनी पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा मुख्य कार्यालयावर हल्ला चढवला. सदर बाजार पोलिसांनी हल्लेखोर दोघांना ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही कोणी फिर्याद देण्यासाठी आले नाही. सर्व तपास करून पोलीस फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्हिडिओ चित्रिकरण करून दगडफेक -