पंढरपूर- शहरातीलमूर्ती बनवणाऱ्या कलाकारावर हातोड्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र मच्छिंद्र धोत्रे (रा. दाल्ले गल्ली, पंढरपूर) जखमी झालेल्या मूर्ती कलाकाराचे नाव आहे. राजेंद्र धोत्रे यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
तिघांनी केली मारहाण-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र धोत्रे यांचा दाल्ले गल्ली येथे मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अंबादास बाबुराव धोत्रे, अशोक चौगुले, किशोर अशोक चौगुले (रा. पंढरपूर) यांनी त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या तिघांनी राजेंद्र यांच्या बरगडीवर हातोडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. यामध्ये बरगडीची हाडे मोडली आहेत. तसेच आरोपींनी काठीच्या सहाय्याने राजेंद्रच्या डोक्यावरही मारहाण केली आहे.
या मारहाणीत राजेंद्र धोत्रे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच जखमी राजेंद्र धोत्रे यांच्या तक्वारीरून अंबादास बाबूराव धोत्रे, अशोक चौगुले, किशोर अशोक चौगुले (सर्व रा. दाळेगल्ली, पंढरपूर) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.