सोलापूर-ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी विरुद्ध राज्य सरकार असे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोलापुरातील विभागीय कार्यालय समोर आंदोलन केले. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन दिवाळी गोड करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दर्जा द्यावा, अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी आंदोलनात विभागीय कार्यालयातील कर्मचारी, एसटी चालक, वाहक व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी गोड करण्याकरिता एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हेही वाचा-एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या-
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा 28 टक्के महागाई भत्ता मिळाला पाहिजे. वार्षिक वेतनवाढ दोन टक्केऐवजी तीन टक्के मिळाली पाहिजे. दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे. तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांना घरभाडे मिळाले पाहिजे, अशा प्रमुख मागण्या यावेळी कृती समितीच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड.. वेतनासाठी 112 कोटींचा मिळणार निधी
ऐन दिवाळीत एसटी बंद करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा-
एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन करत आपल्या विविध मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारचा निषेध नोंदवित राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास ऐन दिवाळीत मोठे आणि तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी कृती समितीचे प्रशांत गायकवाड, मनोज मुदलियार, संतोष जोशी, रजाक मुंडे, सदाशिव आंबूरे, नागनाथ सर्वगोड, पूजा मदने, आरती फुलारी, श्रद्धा जाधव, समीना मणियार, सुषमा गायकवाड आदी उपस्थित होते.
हेही वाचा-ऐन सणासुदीत एसटी कर्मचारी विरुद्ध राज्य सरकार संघर्ष अटळ- कर्मचारी संघटनांचा इशारा
सणासुदीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता-
राज्य सरकारने तात्काळ या मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून होत आहे. जर राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे त्याचा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर होऊ शकतो. परिणामी ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना याचे हाल सोसावे लागणार आहेत.