सोलापूर -पंढरपूर येथे होणारी कार्तिकी यात्रा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, विठू नगरीमध्ये दोन दिवसाची संचारबंदी जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आली आहे. त्यात एसटी महामंडळाला प्रवासी वाहतूक करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एसटी बसेसची ये-जा मुख्य बसस्थानकातून न होता ती चंद्रभागा एसटी स्टँडवरून होणार आहे.
परगावाहून येणाऱ्या एसटी प्रवाशांची होणार तपासणी
कार्तिकी वारीदरम्यान पांडुरंगाच्या नगरीमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे यासह कर्नाटक राज्यातून भाविक विठुमाऊलीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोना रोगाचा संसर्ग वाढत असल्यामुळे आषाढी वारीनंतर कार्तिकी वारी जिल्हा प्रशासनकडून रद्द करण्यात आली आहे. मात्र, पंढरपूरला येणाऱ्या एसटीला जिल्हा प्रशासनाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
पंढरपूर शहरालगतच्या चेकपोस्टद्वारे एसटीची तपासणी होणार आहे. त्यात पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांना आपल्या ओळखपत्रासह पंढरीत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, ज्या प्रवाशांकडे पंढरपूर येथील ओळखपत्र नाही, त्या नागरिकांना तेथूनच आपल्या गावी परत जावे लागणार आहे. त्यामुळे, पंढरपुरात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.