सोलापूर ST Employees On Gunaratna Sadavarte: दिवाळीचा बोनस, सातवा वेतन आयोगानुसार वेतन अशा विविध मागण्याकरीता एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार असं गुणरत्न सदावर्ते यांनी हाक दिली होती. महाविकास आघाडीची सरकार असताना, राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास सहा महिने संप पुकारून एसटी सेवा बंद ठेवली होती. पुन्हा एकदा एसटी संप होणार अशी माहिती, गुणरत्न सदावर्ते यांनी दिली होती. मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्या आवाहनाला सोलापूर एसटी कर्मचाऱ्यांनी कसल्याही प्रकारचा पाठिंबा दर्शवला नाही. उलट गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. आता यापुढे कसल्याही प्रकारच्या संपात सहभागी होणार नसल्याची माहिती, एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees Reaction) दिली आहे.
मागील सहा महिन्यांच्या संपात आर्थिक नुकसान झाले : महाविकास आघाडीची सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, आणि गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत नेतृत्व देखील केलं होतं. एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे. कर्मचाऱ्यांना राज्य शासना प्रमाणे वेतन द्यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने वेतनात वाढ देत एसटी आंदोलन संपविलं होतं. मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. सरकार कोणतीही असो, एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होणारच अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. उलट गेल्या संपात सहा महिने कामावर न गेल्याने विना वेतन सुट्टी झाली. जवळपास दोन ते अडीच लाख रुपये बुडाले. तसेच निवृत्त होताना देखील या सहा महिन्यांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.