सोलापूर - सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन, सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यातील 12 बोटी 19 पोहणारे बचावकार्य करत आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या निर्देशानुसार करमाळा तालुक्यातील कंदर आणि कोंढार चिंचोली येथील उत्कृष्ट पोहणाऱ्या 19 व्यक्ती आणि 12 बोटी निवडून सांगली येथे मदतकार्यासाठी पाठवण्यात आलेल्या आहेत.
करमाळ्यातील 12 बोटीसह 19 पोहणाऱ्यांचे पथक सांगलीत करतेय बचावकार्य - सांगली बचावकार्य
पुराने वेढलेल्या सांगलीकरांच्या मदतीसाठी करमाळा तालुक्यातील कंदर येथील ७ बोटी व १४ जण तर कोंढार चिंचोली येथील ५ बोटी व ५ मच्छीमार युवकांचे एक पथक सांगली येथे पाठवण्यात आले. पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांच्या निर्देशानुसार हे पथक रवाना करण्यात आले आहे. सकाळपासून त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली आहे
या बोटी आणि 19 जणांनी बचाव व मदत कार्यात मोठी कामगिरी केली आहे. अजूनही त्यांचे मदत कार्य सुरूच आहे, अशी माहिती करमाळ्याचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली. करमाळा तालुक्यातील कंदर येथील ७ बोटी व १४ जण तर कोंढार चिंचोली येथील ५ बोटी, ५ मच्छीमार युवकांचे एक पथक सांगली येथे पाठवण्यात आले.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी चांगले बोटी चालवणारे व पट्टीचे पोहणारे व्यक्ती शोधून काढले. पथकातील सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करून सांगली येथे पाठवण्यात आले. त्यांच्या सोबत तलाठी व कोतवाल यांनाही पाठवण्यात आले आहे. सकाळपासून त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली आहे. पूर परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत हे बचावकार्य चालणार आहे.