सोलापूर- हुतात्म्यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या सोलापुरात आज हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्वकाळात १२ जानेवारी १९३१ ला म्हणजे आजच्या दिवशी सोलापुरातल्या ४ हुतात्म्यांना फासावर लटकविण्यात आलं. यामध्ये मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांचा समावेश होता. क्रांतिकारकांचं शहर अशी सोलापूरची ओळख का आहे...त्या बाबत ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट...
हुत्मात्यांचे शहर 'शोलापूर'. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरीरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. शिंदीची झाडं तोडली. यावरून ब्रिटिश पोलीस आणि जनता यांच्यात संघर्ष झाला. यावेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला आणि ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. शंकर शिवदारे हा सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. त्यांनी पोलिसांसह मंगळवार पेठ पोलीस चौकी पेटवून दिली. या आंदोलनादरम्यान ब्रिटीशांचा अंमल झुगारुन दि.९ ,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापुरात तिरंगा फडकविण्यात आला.
जेव्हा ब्रिटिशांच्या राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता (जपान ते अमेरिका) तेव्हा सोलापूर चार दिवस ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, सोलापूरकरांनी सलग चार दिवस स्वतंत्र उपभोगले होते. ही वार्ता इंग्लंडला पोहोचली. तेव्हा सोलापूरचा उल्लेख शोलापूर (शोला म्हणजे आग) असा करण्यात आला. हीच आग शमविण्यासाठी तेव्हा इंग्रजांनी सोलापुरात मार्शल लॉ हा जुलमी कायदा लागू केला. जगाच्या पाठीवर फक्त पेशावर आणि सोलापुरात लावला. धरपकड सुरू झाली. अनेकांना तुरुंगात टाकले गेले.
मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ कायदा सोलापूरला लागू होता. याच काळात सोलापूरच्या मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा आणि अब्दुल कुर्बान हुसेन यांना जनादोलनाचं नेतृत्व केल्याचा ठपका ठेवून दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर पुढे सोलापूरकरांमध्ये ब्रिटिशांची दहशत निर्माण व्हावी म्हणून त्या चौघांना १२ जानेवारी, १९३१ ला फाशी देण्यात आली. ते वीर धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते, म्हणूनच जाणकार आजही सोलापूरचा उल्लेख शोलापूर असं जाणीवपूर्वक करतात.
जगाच्या इतिहासात नोंद घ्यायला लावणारी गोष्ट सोलापूरकरांनी केली होती. त्याच देशप्रेमी भारतीयांवर अर्थात सोलापूरकर क्रांतीकारकांवर दबाव टाकण्यासाठीच सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या आदल्या दिवशी चार हुतात्म्यांना फासावर लटकवले होते. त्या बलिदानाचा ८९ वर्षे झाली. त्याचे स्मरण म्हणून आजही सोलापूरात हा हुतात्मा दिन साजरा केला जातो.