सोलापूर - दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी सोयी सुविधा पुरविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर डॉ. म्हैसेकर यांनी आज सर्व समन्वय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले, की दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी एनसीसी, एनएसएस, स्काऊट, गाईड त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी रांगेत थांबून राहायला लागू नयेत याची काळजी घेतली पाहिजे.
शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड, माढा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे, सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, मुकेश काकडे आदी उपस्थित होते.
जाहिरात प्रमाणित करणे आवश्यक
कोणत्याही उमेदवारांना ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून तसेच सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे, असेही म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.
स्वीपचे विविध उपक्रम
स्वीप उपक्रमाच्या सहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत, असे स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, खर्च विषयक समन्वय अधिकारी महेश अवताडे, डॉ. सुमेध अंदूरकर, डॉ. संतोष नवले, डॉ. भीमाशंकर जमादार, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार रमा जोशी आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी साधला सहायक निवडणूकअधिकऱ्यांशी संवाद
म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकसभा आणि माढा मतदार संघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. आचारसंहिता भंग आणि फ्लाईंग स्कॉड आदीबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र भोसले आदी उपस्थित होते.