सोलापूर- दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या बापाचा खून मुलानेच केल्याचे उघडकीस आले आहे. दररोज दारू पिऊन आईला होत असलेली मारहाण सहन न झाल्याने पोराने कुऱ्हाड आणि विळ्याने बापाचा खून केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे ही घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पत्नी व 2 मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. आज (गुरुवारी) त्यांना सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आईला त्रास देणाऱ्या बापाचा मुलाने केला खून हेही वाचा - करमाळा युवा सेनेकडून जय भगवान गोयलच्या पुतळ्याचे दहन
याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रात गेल्या गुरुवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रेताच्या अंगावर बनियन आणि पॅन्ट होती. त्याची ओळख पटवण्यात अडचणी येऊ लागल्या. या खूनाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले.
हेही वाचा - 'शेतकरी आत्महत्यांना काँग्रेसच्या धोरणांसह शरद पवारच जबाबदार'
संदीप धांडे यांनी मृतदेहाचे फोटो दक्षिण सोलापूर आणि इंडी तालुक्यातील विविध व्हॉटस्अप पाठवले. तसेच जर कोणी मृत व्यक्तीला ओळखत असतील, तर तातडीने मंद्रूप पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले होते. इंडी तालुक्यातील निवर्गी येथील अनिलकुमार दांडेकर यांनी व्हॉटस्अपवर फोटो पाहून मृत व्यक्तीला ओळखले. संबंधित व्यक्ती दत्तात्रय सिध्दाराम चौगुले (वय 50) असून तो मूळचा वळसंग येथील आहे. मात्र, सध्या तो आमच्या निवर्गी येथील शेतात सालगडी म्हणून काम करत आहे. आपल्या कुटुंबासह येथेच राहत असल्याचे दांडेकर यांनी सांगितले. दत्तात्रय यांचा मृतदेह माळकवठे येथे राहणारी मुलगी, जावई तसेच दत्तात्रयच्या भावाने ओळखला.
घटना घडल्यापासून दत्तात्रयची पत्नी सुनिता, मुलगा आतिष आणि अल्पवयीन मुलगा फरार होते. त्यांचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. मोबाईलचे लोकेशन सांगली भागात दाखवत असल्याने धांडे यांनी तपासासाठी 4 पथके सांगोला तसेच सांगली जिल्ह्यातील चडचण भागात पाठविली. रविवारी खबऱ्यामार्फत वरील मारेकरी निवर्गी येथे येत असल्याची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी चडचण पोलिसांच्या मदतीने पत्नी सुनिता चौगुले (वय 45), मुलगा आतिष (वय 23) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.
आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास संदीप धांडे, आबा मुंडे, गोविंद राठोड, भरत चौधरी, अमोल पाटील, नवनाथ कोकरे, श्रीकांत भुरजे, महांतेश मुळजे यांनी लावला.
वडील दत्तात्रय चौगुले हे दारूच्या आहारी गेले होते. रोज दारू पिऊन घरी येऊन आपल्या आईशी भांडण करून तिला मारहाण करत असे. घटनेच्या रात्रीही ते दारू पिऊन घरी येऊन आईला मारहाण करू लागले. त्या दिवशी आमच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी रागाच्या भरात मी आणि माझ्या भावाने कुऱ्हाड आणि विळ्याने छातीवर, मानेवर वार करून वडिलांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून रात्री दीड वाजता मी व भावाने दुचाकीवरून भीमा नदीच्या बंधाऱ्यावर आणला. भीमा नदीच्या पात्रात मृतदेह पाण्यात टाकून दिला.
परत घरी जाऊन आई सुनिताला घेऊन तिघेजण दुचाकीवरून इस्लामपूर येथे पळून गेलो, अशी कबुली आरोपी मुलगा आतिश चौगुले यांनी पोलिसांना दिली. तर दत्तात्रयची पत्नी सुनिता यांनीही पतीच्या रोजच्या भांडणाला आपण कंटाळलो होतो, अशी कबुली दिली.