सोलापूर - महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी उपमहापौर राजेश काळे विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून उपमहापौर राजेश काळे फरार होते. आज (मंगळवारी) सकाळी क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी राजेश काळे यांना अटक केले आहे.
सत्ताधारी भाजपा पक्षाचे नगरसेवक व उपमहापौर असलेल्या राजेश काळे यांनी सोलापूर महानगरपालिकेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मोठे वादळ उठले होते. उपमहापौरांच्या विरोधात सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजेश काळे हटाव, अशी हाक देत आंदोलन केले होते.
भाजपाकडून मिळाला होता २४ तासांचा अल्टीमेटम -
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व सध्याचे उपमहापौर राजेश काळे यांना पक्षाने २४ तासांच्या आत खुलासा मागितला होता. बेशिस्त वर्तन केल्याच्या अनेक तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. तसेच त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे पक्षाबद्दल समाजात गैरसमज निर्माण होत आहेत. उपमहापौर या पदावर असताना प्रशासनाकडून गंभीर स्वरूपचा गुन्हा दाखल होणे म्हणजे हे गंभीर आहे. याप्रकरणी राजेश काळे यांनी २४ तासात खुलासा करावा, अशी नोटीस भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी काढली होती.