सोलापूर- भारताच्या संविधानामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला असल्याची भावना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील केमचे अनिरुद्ध कांबळे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. त्या पार्श्वभूमीवर करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत केम येथे आयोजित शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अध्यक्ष कांबळे यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. शेती आणि पशुपालन या विषयावर विविध प्रकारे भाष्य करत त्यांनी ग्रामीण भागातील जीवनशैलीवरही प्रकाश टाकला. तसेच केममधील अजित तळेकर यांनी अध्यक्ष पदासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेत त्यांनी निभावलेल्या किंगमेकरच्या भूमिकेचा वारंवार उल्लेख उपस्थितांकडून करण्यात आला.