सोलापूर- जिल्ह्यात महिलांच्या आरोग्यासाठी आराखडा तयार करणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्याकडे करायला दुर्लक्ष नको. प्रत्येक महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे महत्त्व समजावून सांगण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत साईप्रसाद बॅन्क्वेटमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
मासिक पाळी व्यवस्थापन ही बाजू महिलांना समजावून ceसांगण्यासाठी महिला प्रशिक्षक निर्माण होणे अपेक्षित आहे. चांगल्या दर्जाचे मास्टर ट्रेनर तयार झाले पाहिजेत. यासाठी जिल्ह्याचा आराखडा बनवण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यात व्यापक प्रमाणात महिलांच्या आरोग्यासाठी मोहिम हाती घेण्यात येत आहे. ८ ते १० वी मधील मुली, महिला यांच्यापर्यंत पोहोचून सॅनिटरी नॅपकीनचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मनुष्य बळ विकास तज्ज्ञ इंदिरा परब यांनी मासीक पाळी व आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. त्याबाबत अंधश्रद्धा बाळगू नका. स्वच्छता हा घटक महत्वाचा आसल्याचे परब म्हणाल्या.
प्रशिक्षक हेमांगी जोशी यांनी महिलांना विविध गटकार्य करून शोषक साहित्याचा वापर आणि त्याची विल्हेवाट लावण्याची पध्दती यावर चर्चा केली. आता माझी पाळी हा लघुपट दाखवण्यात आला. हे कार्य करण्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या मोहिमेस चांगले यश आले आहे, असेही त्यांनी सांगितले.