सोलापूर -महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात सर्वत्र खड्डे पडले आहेत आणि भोंगळ कारभार चालू आहे, असा आरोप शहर काँग्रेसने केला. तसेच शहर काँग्रेसच्यावतीने त्याचा निषेध म्हणून मोटार रेस स्पर्धेचे आयोजन केले.
यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले, सोलापूर महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कुठलेही योग्य नियोजन न करता सोलापुर शहरात आणि इतर अनेक ठिकाणी रस्ते तसेच ड्रेनेज, इतर कामे अतिशय संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी खड्डे खणले आहेत. तसेच शहरात रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहेत, हेच समजत नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यातच पावसामुळे सर्वत्र चिखल, दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. नागरिक खड्यात पडत आहेत. अपघात होत आहेत. अंगदुखीचे व इतर आजार शहरातील नागरिकांना होत आहेत. धुळीचाही प्रचंड त्रास होत असल्यामुळे नागरिकांना विविध आजार होत आहेत. शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत. स्मार्ट सिटीचे कामे, निकृष्ट आणि अतिशय संथगतीने सुरू आहे. हे सोलापूर आहे की खड्डेपुर हेच समजेना झाले, असा आरोप त्यांनी केला.